04/04/2018
जीएसबी पेट्रोलियम विश्वासार्हता जपण्याचे काम करेल – शिवेंद्रसिंहराजे भोसले
राज्यभरातून पर्यटनाच्या निमित्ताने परळी भागात येणारे लोक आणि स्थानिक नागरिक यांची जीएसबी पेट्रोलियमच्या माध्यमातून चांगली सुविधा झाली आहे. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार पेट्रोल – डिझेल मिळण्याची सुविधा या भागात निर्माण झाली असून जीएसबी पेट्रोलियम सर्वांना विश्वासार्ह सेवा देण्याचे काम करेल असा विश्वास सातारा – जावली तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
परळी भागात अंबवडे खुर्द येथे जीएसबी पेट्रोलियमचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, भिकूभाऊ भोसले, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कमल जाधव, पंचायत समिती सदस्य विद्या देवरे, माजी पंचायत समिती सदस्य संजय भंडारे, आर. वाय जाधव ( सर ), सोमनाथ जाधव, जनता बँकेचे मुकुंद सारडा आदी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, जीएसबी पेट्रोलियमचे मालक किशोर घोडके, दीपक शिंदे आणि बाळासाहेब गडकरी यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये लोकांची विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीमध्येही ते सर्वांच्या विश्वासास पात्र राहतील. परळी भागात अनेक वर्षांपासून एका पेट्रोलपंपाची गरज होती ती गरज या पंपाच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. एस्सार कंपनीचे पेट्रोल अत्यंत दर्जेदार असल्यामुळे लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या भागात राज्यभरातून येणा-या पर्यटकांचीही सोय झाली असून आता त्यांना सर्व सुविधा मिळतील. भविष्यात या भागात आणखी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले म्हणाले, अनेकांच्या सहकार्यातून या पंपाचे काम उभे राहिले आहे. भागातील लोकांच्या सुविधेसाठी हा पेट्रोलपंप झाला असून आता कोणालाही जीव धोक्यात टाकून पेट्रोलसाठी शहरात जावे लागणार नाही. परळी भागातील सर्व लोकांचेही चांगले सहकार्य या पंपाला मिळेल.
संजय भंडारे म्हणाले, परळी भागातील लोकांची इंधनाची सोय जीएसबी पेट्रोलियममुळे झाली आहे. या भागातील विकासामध्ये या पंपाचा मोठा वाटा असेल तसेच सर्व भागातील लोकांच्या मनातील अपेक्षा या पंपाच्या माध्यातून पूर्ण झाल्या आहेत.
परळी भागातील लोकांची गरज ओळखून भागाच्या सेवेसाठी हा पंप सुरू केला आहे. त्यामुळे अत्यंत चांगल्या दर्जाचे पेट्रोल – डिझेल लोकांना देऊ असा विश्वास प्रा. दीपक शिंदे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.
कार्यक्रमाला परळी भागातील सुमारे 60 गावातील सरपंच आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बांधकाम व्यावसायिक तुषार पवार, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर विलास शिंदे, आर. आर. स्टोन क्रशरचे संतोष भोसले आदींचा सत्कार करण्यात आला.
पेट्रोलपंपाच्या कार्यालयाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांच्या हस्ते तर पेट्रोलपंप मशीनचे उदघाटन जे. के. देवी आणि मामा नागोरी यांच्या हस्ते झाले. पेट्रोलियम असोसिएशनचे सचिव रावखंडे साहेब, विपुल शहा, पारेख, सराफ कट्टा ग्रुप व सराफ असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. किशोर घोडके यांनी आभार मानले.